वाटचाल

शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं या उद्देशानं ‘पालकनीती परिवार’ या संस्थेनं सुरू केलेला ‘खेळघर’ हा एक प्रकल्प. पुण्यातील कोथरूडच्या लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील सुमारे एकशेपन्नास मुलं या उपक्रमात सहभागी आहेत.

वाटचाल 2010-2013

खेळ्घरच्या 2010 ते 2013 या काळातील अहवाल

पुर्वावलोकनAttachmentSize
Khelghar Watchal-2010-2013-Final.pdf608.52 KB

मागे वळून पाहताना

१९९६ साली संजीवनी बरोबर आणखी सहा जणांनी एकत्र येऊन " पालकनीती परिवार " या संस्थेची स्थापना केली .पूर्वी आर्कीटेकट म्हणून व्यवसाय करणाऱ्या शुभदा जोशी ह्या संस्थेच्या विश्वास्तांपैकी एक आहेत . १९९४ पासून त्या पालकनीती मासिकाच्या कामाशी जोडल्या गेल्या . या कामातून सभोवतालच्या परिस्थितीकडे संवेदनक्षमतेने बघायची सुरुवात झाली होती . शुभदा जोशीच्या घराजवळच "लक्ष्मीनगर" ही बांधकाम कामगारांची झोपडवस्ती वसली आहे. ही वस्ती डोंगरउतारावर असल्यान सरकारमान्य होऊ शकत नाही. इथे आगदी छोट्या - छोट्या पत्र्याच्या झोप्द्यातून माणस- मुल राहतात .वीज -पाणी-संडास इतक्या मुलभूत सुविधाही त्यांना अभावानेच मिळतात.

आई -वडील दोघंही दिवस -दिवस कामानिमित्त बाहेर असतात. मुल घरात एकटीच .मग लहानांना सांभाळण्यासाठी मोठ्यांना शाळा राहून जातात. शाळेत घातली तरी आणा -पोचवायला पालकांना वेळ नसतो,जरुरीच्या वस्तू विकत आणयला पैसा नसतो, मुल शाळेत जातात ना,ह्याकडे लक्ष देण शक्यच नसते. खेरीज शाळांतल्या दमदातीच्या वातावरणात मुल रमत नाहीत. ह्या सगळ्या कारणांनी मुल शिक्षणापासून वंचित राहतात. आजूबाजूला दारू, भांडण- मारामाऱ्या- -शिवीगाळ -टगेगिरी-जुगार यासारख्या गोष्टीनी भारलेल जग. या वातावरणाचे मुलांवर निश्चितच वाईट परिणाम होतात.त्यांची काहीच चूक नाही, तरी हि मुल तिथ आहेत,दारिद्र्याशी झुंजताहेत, कष्ट्ताहेत.याच कारण केवळ त्याचं नशीब किवा प्रयत्नांचा अभाव एवढाच नाही. याचं मुख्य कारण आहे पशाकडे पैसा नेण्यार्या आजच्या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये .ही व्यवस्था जरी आपण बनवली नसली तरी यातली विषमता आपल्याला अस्वस्थ बनवते .एकीकडे जन्माने वरच्या मानल्या गेलेल्या जातीत -वर्गात मिळालेल्या स्थानामुळे या व्यवस्थेचे अनेक फायदेही आपसुख आपल्या पदरात पडतात. त्यामुळे ज्यांना हे फायदे मिळत नाहीत त्याच्यासाठी आपणच काहीतरी करायला हव अस आम्हाला तीव्रतेन वाटल, पालकनीती मासिकाच्या माध्यमातून मुलांच्या हक्कांबद्दल , बाल्मानसाबद्दल ,शिक्षणासंद्र्भातल्या संशोधनाबद्दल सातत्यान विचार होत होता त्यामुळे कामाची दिशा स्पष्ठ होत गेली.

यातूनच १९९६ मध्ये शुभदा जोशी यांच्या राहत्या घरात लक्ष्मीनगर मधल्या मुलांच्यासमवेत संस्थेच 'खेळघर' सुरु झाले .काम करता करता या मुला -मुलींचं वास्तव ,अडचणी समजावून घेण शक्य झाल.त्यांना शिकण्याची गोडी लागावी, शिकण्यासाठीच्या विविध क्षम्ताचा विकास व्हावा ,याशी काय करायला हव नि काय अजिबात करायला नको या बाबतीत आमचे विचार स्पष्ठ होऊ लागले.

हळूहळू समविचारी व्यक्तींचा जट जमू लागला आणि अनेक पातळ्यांवर कामाची सुरुवात झाली.खेल्घारत्या मुलांची संख्या वाढली .१९९८ साली लक्ष्मिनगर्मध्ये पालकांच्या मदतीने एका पत्र्याच्या शेडमध्ये 'आंनद्सकुल ' सुरु झाले. मुलांना शिकण्यातला आनद समजावा म्हणून वयोगटाप्रमाणे खेळघर, अभ्यासवर्ग , संवादवर्ग ,सहली,शिबीर असे अनेक उपक्रम सुरु झाले. २००३ मध्ये शुभदा जोशींच्या घराशेजारी ऐका स्वतंत्र सदनिकेत खेलघरच स्थलांतर झाल .मुलांना खेळायला ,वाचायला,अभ्यासाला स्वतंत्र जागा मिळाली. आता या कमी नौ पूर्णवेळ व दहा अर्धवेळ कार्यकत्यांचा सहभाग आहे.
इतक्या वर्षाच्या या कामानंतर आता खेळघर च्या कामातून आम्हाला काय साधायचे आहे याची काहींशी स्पष्टता आली आहे.

नेमक्या या टप्प्यावर ‘सर रतन टाटा ट्रस्ट’ या संस्थेच्या निधीची (फंडिंगची) मुदत संपली. एका बाजूला खर्च वाढून बसलेले नि दुसरीकडे अपुरा निधी. वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजकडे, कॉर्पोरेटस्कडे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००६ साल या प्रयत्नात गेलं. जवळची पुंजी संपत चालली होती. आहे ते काम चालू ठेवण्यासाठी निधी अत्यंत आवश्यक होता. पण त्याबरोबरच हे काम आणखी पुढे नेण्याच्या अनेक दिशाही खुणावत होत्या.

लक्ष्मीनगरमधल्या फक्त ऐंशी मुलांपर्यंत पोचणं पुरेसं नव्हतं. या कामातून जमा झालेल्या अनुभवाच्या पुंजीच्या जोरावर खेळघरासारखी आणखी कामं सुरू करू शकू असा आत्मविश्वास वाटत होता. तसंच याच वस्तीतल्या शालाबाह्य मुलांबरोबर काम करायची निकडही जाणवत होती. खेळघरातल्या दहावी पास झालेल्या मुलांना सोडून द्यायला जीव धजावत नव्हता.

या संदर्भात सर रतन टाटा ट्रस्टशी पुन्हा साकल्यानं बोलणं केलं आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, या सार्‍या नव्या आव्हानांसह आधीच्या कामासाठीचाही आर्थिक भार उचलण्याची ट्रस्टने जबाबदारी घेतली. एवढेच नव्हे तर वेळोवेळी त्यांच्याबरोबर होणार्‍या चर्चांमधून प्रोत्साहन तर मिळालंच त्याबरोबर मार्गदर्शनही मिळालं.

नवी आव्हाने, नवे प्रकल्प

चर्चा आणि विचारांती सध्याच्या खेळघराच्या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी योजना आखल्या, तसेच काही नवी कामे सुरू करायचेही ठरवले.

आम्ही तीन नवे प्रकल्प हाती घ्यायचे ठरवले. तिन्ही दिशा आम्हाला पूर्णपणे नवीन होत्या.

- नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून बाहेरच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण
- शालाबाह्य मुलांची व पालकांची शाळेत जाण्याची मानसिकता तयार करणं
- युवक प्रकल्प (शैक्षणिक मदत आणि जाणिवांचा विकास व युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविणे.)

खेळघराचं काम मुलांबरोबरचं, त्यामुळे मोठ्यांच्या प्रशिक्षणाचं काम हा वेगळाच आयाम होता. शाळेत जाऊ न शकणार्‍या मुलांचे प्रश्न हे शाळेत जाऊन खेळघरात येणार्‍या मुलांच्या प्रश्नांपेक्षा अधिक गंभीर नि वेगळेही आहेत याची जाणीव होती. खेळघरातून मोठ्या झालेल्या तरुणांबरोबरचं काम जरी त्यामानानं सोपं असलं तरी वस्तीतल्या खेळघराबाहेरच्या मुलांबरोबरचं काम आव्हानात्मक होतं.

चालू खेळघराच्या कामात भर

सकाळच्या बॅचची सुरुवात

माध्यमिक गटातल्या मुलींची शाळा सकाळी तर मुलांची शाळा दुपारी असते. सायंकाळी मुलं अभ्यासाला कंटाळतात. मुली मात्र दुपारी घरी जाऊन, जेवून ताज्यातवान्या होऊन खेळघरात येतात. हायस्कूलच्याही शाळा काही मुलांच्या सकाळी तर काहींच्या दुपारी आहेत. खेळघराची वेळ तीननंतरची होती त्यामुळे दुपार शाळेतल्या मुलांवर अन्याय होतोय असे वाटले. म्हणून खेळघर आणि आनंदसंकुल दोन्ही जागी सकाळचे वर्ग सुरू केले.

खेळघरात हायस्कूलच्या मुला-मुलींच्या सकाळच्या वर्गाची जबाबदारी वाटून घेतली. आनंदसंकुलमधल्या सकाळगटाची जबाबदारी रेशमा लिंगायतने घेतली. आठवी ते दहावी गटाला औपचारिक अभ्यासातल्या मदतीची गरज अधिक असते. या गरजेनुसार सकाळी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल असे वर्ग सुरू झाले.

औपचारिक विषयांच्या अनौपचारिक शिक्षणाची घडी बसवणे

खेळघरात शिकवल्या जाणार्‍या विविध औपचारिक विषयांचा, त्यातल्या मूलभूत संकल्पनांनुसार आणि टप्प्यांनुसार अभ्यासक्रम ठरवणे, नि त्यातल्या पर्यायी पद्धती शिकणे हा दुसरा उपक्रम.

गणित - या तीन वर्षांत गणिताच्या कामाला गती आली. आम्ही भारतभरातल्या विविध संस्थांनी तयार केलेली गणिताची साधनं आणली. ती कशी वापरायची याची प्रशिक्षणं घेतली.

इंग्रजी - २००४ मध्ये यशोधरा कुंदाजींनी अनौपचारिक पद्धतीनं इंग्रजी विषय कसा शिकवावा याचं आमचं वर्षभर प्रशिक्षण घेतलं होतं. त्या सगळ्या साधनांची संगती लावून इंग्रजीचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावर्षी इंग्रजी विषयाची जबाबदारी वाटून घेतली आहे.

इतिहास-भूगोल या विषयासंदर्भात जमतील तेव्हा मुलांचे वर्ग घेण्याबरोबरच तायांबरोबरही त्यांनी संवाद साधला. भाषा नकाशाची, एकलव्यची सामाजिक अध्ययन पुस्तके यावर आधी काम झाले होते. आता संगती - अवेही या संस्थेच्या पाच संचांचा गटाने अभ्यास करून मांडणी झाली. मुलांच्या जाणीवांच्या विकासासाठी हे साहित्य फार महत्त्वाचे आहे.

विज्ञान - खेळघरात मुलांना विज्ञानातल्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग करून बघून समजावून घेता याव्यात म्हणून छोटीशी प्रयोग शाळा उभी केली आहे.

औपचारिक विषयांतील एकसुरीपणा व उपरेपणा जाऊन मुलं मनापासून शिकण्याकडे वळतील, आपल्या जीवनाला जोडून बघून त्यात रस घेतील यासाठी हे काम फार महत्त्वाचं आहे. पूर्वीपेक्षा औपचारिक अभ्यास विषयांची खेळघराची शाखा आता खूपच समृद्ध झाली आहे.

चालू खेळघराच्या रचनेतले बद्दल

या सगळ्या प्रयत्नांमुळे मुलांची संख्या वाढते आहे. सध्या ती १५० एवढी आहे. खेळघराची जागा मध्यवस्तीतली आणि लहान आहे. एकाच गटातील मुलांच्या वयात फार फरक असेल तर काही ऍक्टीव्हिटी घेणे कठीण होते.

या सगळ्या कारणांनी पूर्वीच्या खेळघराच्या उस्फूर्त आणि त्यामुळे काहीशा सैल पद्धती बदलून अधिक नेटकी घडी बसवणे आवश्यक होते.

त्यासाठी इयत्तेनुसार आम्ही मुलांचे वेगळे गट करून त्या गटासाठीची जागा व वेळ निश्चित केली. एकेका गटाची संपूर्ण जबाबदारी एकेका ताईने घेतली. मुलांच्या अभ्यास संकल्पना, जाणिवांचा विकास याबरोबरच एकूण त्यांच्या शिक्षणाच्या वाटेत येणारे सारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न होतो. पालक, शिक्षक, शेजारी, मुलांची मित्र मंडळी, वस्तीतली दादा-भाई अशा सर्व संबंधित लोकांशी त्यासाठी ताईंना संवाद ठेवावा लागतो.

शिक्षक प्रशिक्षण

खेळघरामधे लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावेत म्हणून दर गुरुवारी २ ते ३ तासांची बैठक असते. सर्व गटांच्या कामाचे आळीपाळीने सादरीकरण आणि त्यावरील चर्चा इथे होते. याला जोडून अभ्याससत्रांची आखणी होते.

कधी एखाद्या पुस्तकावर किंवा विषयावर चर्चा होते. कधी कधी बाहेरून त्या विषयातल्या तज्ञांनाही आमंत्रण दिले जाते. २-३ दिवसांची सलग कार्यशाळा, शैक्षणिक सहलीही होतात. कर्ता करविता, टीचर, अवेही - संगतीचे संच, IHMP (Institute of Health Management Pachod) ची जीवन कौशल्ये अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास या गटात झाला.

तसेच गणित, इतिहास, भाषा नकाशाची, बजेटिंग, रिपोर्ट रायटींग, इ. विषयांवर विषयतज्ञांची सत्रे झाली. तर जेन साहींची सीता स्कूल, ग्राममंगल (ऐना), अक्षरनंदन, निर्माण, open space अशा ठिकाणी शैक्षणिक सहली योजल्या होत्या.

पौष्टिक खाऊ

खेळघरातली विशेषतः लहान मुलं आणि मुली ऍनिमिक असतात. त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासावर व शारिरिक विकासावर विपरीत परिणाम होतो. खेरीज अनेकदा शाळेतून परस्पर मुलं खेळघरात येतात. त्यांना भूक लागलेली असते त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.

आहारासंदर्भात मुलांची संपूर्ण गरज भागवणे तर आम्हाला शक्य नाही पण काही किमान तर करता येईल या उद्देशाने आठवड्यातून २ किंवा ३ वेळा मुलांना पौष्टिक खाऊ देण्याचे ठरवले. अनेकदा मुलं मिळूनच हा खाऊ खेळघरात तयार करतात. खेळघराचे काही हितचिंतक यासाठी नियमित देणगी देतात.

नवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून

बर्‍याच जणांना आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं असं वाटतं. पण समविचारी साथीची कमतरता जाणवत असते. अशा मित्रांना खेळघरासारखं काम सुरू करण्यासाठी बळ मिळावं, दिशा मिळावी यासाठी खेळघरानं ३ वर्षांपूर्वी ‘प्रशिक्षण शिबिरं’ घ्यायचं ठरवलं.

साधारणतः दिवाळीनंतरच्या काळात ५ दिवसांचे शिबिर असते. आजवर ३ वर्षांत सुमारे १६० लोक या शिबिरात सहभागी झाले. शिबिराची सुरवात खेळघर आणि आनंदसंकुल अनुभवण्यातून होते. भाषा, कला, नकाशाची भाषा, खेळ अशा विविध विभागांमधून ऍक्टीव्हिटी करून बघताना लोकांना खेळघराच्या अनौपचारिक वातावरणाचा आणि पद्धतींचा अनुभव घेता येतो.

‘शिकण्या’ संदर्भातल्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून दुसर्‍या दिवशीची सुरवात होते. बालमानसशास्त्र, जाणिवांचा विकास, लैंगिकता शिक्षण, संवादाचे माध्यम या विषयांबरोबरच भाषा, गणित, विज्ञान, अशा अनौपचारिक विषयांसंदर्भातल्या पद्धतींवर पुढील पाच दिवसात काम होतं. खेळघरातील आणि पालकनीती परिवारातली मंडळी विविध सत्रे घेतात.

या शिबिरांच्या माध्यमातून आता चार नवी खेळघरे सुरू झाली आहेत. BSSK - सांगली, प्रगत शिक्षण संस्था - फलटण, निरामय विकास संस्था - सावंतवाडी या कामांबरोबरच खेळघराच्या युवकगटानेही २ खेळघरे सुरू केली आहेत.

पुढील २-३ वर्षे आम्ही या नव्या खेळघरांच्या संपर्कात रहातो. त्यांना मदत करतो. याव्यतिरिक्त अनेक संस्थांच्या सध्याच्या अनौपचारिक शिक्षणाच्या कामातही या शिबिराची मदत होते. ह्या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही करत असलेलं कामाचं अधिक बारकाईनं विश्लेषण केलं नि मांडलं. अनेक शैक्षणिक साधने आणि माहितीच्या लिखीत प्रतीही तयार झाल्या.

नवा प्रकल्प - युवक गट

दहावीच्या पुढील मुलांबरोबरच्या कामाची कल्पना ही आम्ही सुरवातीच्या काळात केली नव्हती. पण नंतर मात्र आम्हाला जाणवलं की या टप्प्यावर जर मुलांना मदत केली नाही तर एकतर ती पुढे शिकत नाहीत किंवा कलाशाखेत प्रवेश घेतात. त्यामुळे घेतलेल्या औपचारिक शिक्षणाचा त्यांना पायावर उभं रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. म्हणून दहावी पास झालेल्या मुलांना व्यवसाय मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या प्रकल्पाची योजना ठरली.

दरवर्षी मे-जूनमधे खेळघराच्या मित्र-मैत्रिणींना आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते, त्यातून निधी जमा होतो. या योजनेतनं आजवर २५ मुले उच्चशिक्षण घेत आहेत.

या बरोबरच मुलांच्या सामाजिक जाणिवांचा विकास व्हावा म्हणून काम होते. वर्ग - जात - लिंगभाव समानता, स्वातंत्र्य, शोषण, राजकारण अशा विविध विषयांवर चर्चा होते. मुलं त्यांचे स्वतःचे प्रकल्प करतात. खेळघरातनं घेतलेल्या मदतीची परतफेड म्हणून त्यांनी सामाजिक काम करण्याची अपेक्षा असते. काही मुलांनी एकत्र येऊन भालेकर वस्ती या कचरा वेचकांच्या वस्तीत खेळघर सुरू केले आहे.

नवा प्रकल्प - शालाबाह्य वर्ग

सहा वर्षांच्या पुढच्या, शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी खेळघरानं काम करावं असं फार दिवस मनात होतं. शाळेत न जाणार्‍या मुलांमधे कर्नाटकातल्या स्थलातरितांची संख्या जास्त आहे. भाषिक प्रश्न, गरिबी, धाकट्या भावंडांना संभाळायला मोठ्या बहिणींना घरी थांबावे लागते, अंधश्रद्धा अशा अनेक कारणांनी ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. शाला बाह्य वर्गात गाणी, गोष्टी, खेळ, कला या गोष्टींत ही मुलं रमू लागतात. त्यांच्या मनात शाळेत जाण्याची इच्छा मूळ धरते. मग जूनमधे ताई त्यांचे जन्माचे दाखले मिळवून देतात आणि पालकांचे समुपदेशन करून शाळेत प्रवेश घेतला जातो.

ही मुले शाळेत जातात ना याकडे ताईचे लक्ष असते. शाळेत जाऊन दुपारच्या वेळात ही मुलं खेळघराच्या प्राथमिकच्या वर्गातही येऊ लागतात. गेल्या तीन वर्षांत ह्या गटाची व्यवस्थित घडी बसली आहे. मात्र आम्ही प्रयत्न केले म्हणून सर्व मुलांना विशेषतः मुलींना शाळेत जाणे शक्य होते असे नाही. परिस्थिती जिथे अगदी बिकट असते, आईला घर नि मूल मोठ्या मुलीवर टाकून जाणे भागच असते, तिथे त्या मुलींच्या शिक्षणावर गदा येते.

या मुलींवर ‘मुलगी’ म्हणून खूप बंधनं असतात. १४-१५व्या वर्षी त्यांची लग्ने होतात. या मुलींना किमान जीवन कौशल्यांचे शिक्षण मिळावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आम्ही गेल्या वर्षी ‘येल्लरू’ (आपण सार्‍याजणी) हा नवीन प्रकल्प सुरू केला. या वर्षी ‘प्राज फाऊंडेशन’ या कंपनीने या प्रकल्पाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले आहे.

आजची परिस्थिती

आज खेळघर लक्ष्मीनगर मधल्या १५० आणि नव्या खेळघरांच्या माध्यमातून आणखी १५० मुलांपर्यंत पोचू शकले आहे. खेळघरात सलग ३-४ वर्षे नियमित येणार्‍या मुलांमधे निश्चित बदल जाणवतात. त्यांचा व्रात्यपणा कमी होऊन ती शिकण्याकडे वळलेली दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास जाणवतो. तायांशी तर ते त्यांना आवडलेल्या - खटकलेल्या गोष्टी मोकळेपणाने बोलतातच पण अगदी परदेशी पाहुण्यांशीसुद्धा बोलायला बिचकत नाहीत.

नियमित येणारी ९५% मुलं दहावीपर्यंत पोचतात, पास होतात नि त्यांना पुढे शिकण्याची इच्छाही असते. एवढेच नव्हे तर खेळघराकडून आर्थिक मदत मिळवण्याकरता योजलेले निकष पूर्ण करून दाखवतात. युवक गटातल्या तीन मुलांचे गेल्या वर्षी डिप्लोमा इंजिनियरींग पूर्ण झाले. त्यातली दोघे आता डिग्री इंजिनियरींग करताहेत. दोघांना चांगल्या नोकर्या लागल्यात. मुलीही, डिप्लोमा इंजिनियरींग, आर्किटेक्चरल ड्राफ्टस्मन, नर्सिंग, डी.एड., बालवाडी शिक्षिका सारखे कोर्स करताहेत. खेळघरात येणार्या मुलींची लग्ने आता १८ वर्षानंतरच होतात.

टगेगिरी, व्यसने - गुन्हेगारी ह्या दिशेनं असलेली मुलग्यांची ओढ आता पुष्कळशी कमी झालीये. भिन्नलिंगी आकर्षणांसंदर्भात मुलगे नि मुली आता अधिक जबाबदारीनं वागतात. मुलग्यांपेक्षा मुली अधिक प्रयत्नशील व समजूतदार वागताना दिसतात. खेळघरातून मिळणार्या प्रत्येक संधीचा त्या फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांचे पालक आता लवकर लग्नाकरता मागे लागत नाहीत उलट दहावीनंतर ३-४ वर्षे शिकवण्याची त्यांची तयारी वाढते आहे.

खेळघरात आज ३ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ७ पगारी कार्यकर्ते पूर्णवेळ काम करतात. ८ जण अर्धवेळ काम करतात. या खेरीज ७ स्वयंसेवी कार्यकर्ते आठवड्यातून २ ते ३ दिवस काही वेळ करता काम करतात. खेळघराकडे असलेल्या दोन्ही जागांतही आता काम मावत नाहीये. वस्तीमधे जागेचा शोध चालू आहे.

खेळघर विविध पुस्तके, शैक्षणिक साधने, शैक्षणिक उपकरणे, खेळ यांनी समृद्ध आहे. गेल्या वर्षभरात खेळघराला २ पुरस्कार मिळाले. झी २४ तास चा ‘अनन्य पुरस्कार’ आणि ‘गरवारे बालभवनचा पुरस्कार’ या पुरस्कारांमुळे व वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखांमुळे खेळघराचं काम अनेकांपर्यंत पोचते आहे.

खेळघरातल्या मुला-मुलींमधे सामाजिक भान रुजतंय, सभोवतालच्या समाजासाठी त्यांनाही काही काम करावंसं वाटतंय. मोठ्या मुलांकडून धाकट्यांना प्रेरणा मिळतेय.

खेळघराचे काम आता एका व्यक्तीभोवती केंद्रित राहिले नाही. पालकनीती परिवाराचे ३ विश्वस्त, २ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ३ पगारी कार्यकर्ते अशांचे मिळून ‘कार्यकारी समिती’ बनली आहे. कामासंदर्भातले सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेते. कामांच्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या जातात.

खेळघरासमोरील आव्हाने

इथपर्यंत वाटचाल झाली तरी प्रश्न संपले आहेत असे म्हणता येणार नाही.

• विविध उपक्रमांमुळे खेळघराचा खर्च प्रचंड वाढला आहे. आणि आता सर रतन टाटा ट्रस्टच्या फंडींगची ३ वर्षांची मुदत संपतेय. पुन्हा व्यवस्था करायला हवी. पुन्हा शोध घ्यायला हवा. अनेकदा वाटतं मुलांबरोबरचं काम मागे पडून इतरच व्यवस्थापनाच्या कामात खेळघरातल्या सक्षम कार्यकर्त्यांचा अधिक वेळ जातोय.

• खेळघरातल्या मुलांची संख्या वाढली आहे. नवे प्रकल्प सुरू झाले आहेत त्यामुळे आत्ताची जागा कमी पडते आहे. वस्तीतच आणखी एखादी जागा शोधत आहोत.

• खेळघरात मुलांना दादा मिळत नाही. सगळ्या ताया आणि काकूच. त्याबरोबरच नवीन माणसं जोडली जाताहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी जबाबदारी वाढलीय.

• खेळघराचे काम आता पूर्णपणे शैक्षणिक झाले आहे. वस्तीतल्या सामाजिक प्रश्नांमधे लक्ष घालणे आता शक्य होत नाहीये. कारण बहुतेक वेळा हे प्रश्न वस्तीपुरते मर्यादित असत नाहीत. त्यासाठी व्यापक पातळीवरच्या आंदोलनांशी जोडून घेणं गरजेचं असते. खेरीज हे काम प्रचंड वेळ आणि ताकद खाणारे असते. सामाजिक प्रश्नांमधली गुंतवणूक वाढली की त्यातून पुढे उभी राहणारी आव्हानं प्रसंगी रचनात्मक कामासाठी अडथळा ठरतात. विचारपूर्वक आम्ही शिक्षणाच्या रचनात्मक कामावरच भर द्यायचा असे ठरवले आहे.

मात्र त्यामुळे आपण मुलांच्या वास्तवापासून, भावविश्वापासून थोडे अंतर राखतो हे स्वीकारावे लागत आहे.
• ताया-कार्यकर्त्यांचा गट आता खूप मोठा झाला आहे. मिटींग्जमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायला वेळ व अवकाश मिळेनासा झालाय. नवे प्रकल्प, टारगेटस् या कामाच्या ताणामुळे व वेगामुळे लोकशाही पद्धतीनं निर्णय प्रक्रियेसाठी लागणारा वेळ देणं परवडेनासं झालंय.

• वाढत्या कामाच्या रेट्यामुळे अधिक रचना बद्धतेकडे आम्ही झुकू लागलो आहोत. त्यामुळे उत्स्फूर्ततेला, लवचिकतेला अनेकदा फाटा द्यावा लागतोय.

• मुलांची मानसिकता घडवण्यासाठी पालकांमधे बदल घडवणे आवश्यक आहे. पुढील काळात पालकांबरोबरचे काम अधिक नेटाने करण्याची गरज आहे.

• कुमारवयीन - मुले व मुलींमधलं काम हे खेळघराचं वैशिष्ट्य. पण या गटाबरोबर अतिशय ताकदीनं व तयारीनं काम करावं लागतं. त्या ताकदीचे कार्यकर्ते तयार होणं हे आव्हानच आहे. कुमारवयीन व युवक गटातील मुला-मुलींची मानसिकता समजावून घेऊन पुढे अधिक सक्षमतेनं काम करण्याकरता खेळघराच्या कार्यकर्त्यांना अधिक सखोल प्रशिक्षणाची गरज आहे.

• नवी खेळघरे, शालाबाह्य आणि येल्लरू प्रकल्प, युवक गट अशा नव्या प्रकल्पांमुळे कामाचा आवाका वाढतो आहे. त्याबरोबरच आव्हानंही वाढताहेत.

लक्ष्मीनगर बदलतंय .....

आता घराजवळ नळ झालेत, ड्रेनेजची सोय झालीये, स्वच्छता गृहे बांधलीयेत, रस्ते झालेत, बहुसंख्य कुटुंबांना रेशनकार्डे, विजेचे मीटर मिळाले आहेत. १५-२० वर्षे वस्तीत रहाणार्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. खेळघराच्या १५ वर्षांच्या, टिकून राहिलेल्या कामामुळे पालकांमधे शिक्षणाविषयीची आस्था वाढलेली जाणवते. खेळघराच्या प्रयत्नातून जवळपास २५ मुलं नि २० मुली स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या राहिल्यात - राहण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकणं, चांगली नोकरी मिळवणं, शक्य आहे असा विश्वास त्यांच्या मनात रुजतो आहे.

तरीही नव्यानं स्थलांतरीत झालेल्या, होत असलेल्या कुटुंबांचं प्रमाण कमी नाही. अजूनही शाळांच्या वेळात रस्त्यांवर दंगा घालणारी अनेक मुले दिसतात. नाक्या-नाक्यावर टगे मंडळी उभी असतात. जुगाराचे डाव मांडून तरुण बसलेले असतात. दारू अजिबात कमी झालेली नाही. सकाळी ७ वाजता गाड्या भरभरून बांधकाम कामांवर जाणार्‍या कामगारांमध्ये अजूनही १०-१२ वर्षांची मुले-मुलीं मोठ्या संख्येने असतात. लक्ष्मीनगरला आता स्वतंत्र पोलिस चौकी मिळालीय. मारामार्‍या - खुनांच्या घटना थोड्याबहुत कमी झाल्यात. पण तरीही राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधी घोषणाबाजी करतात, लहान लहान मुलांनाही या गटांचं आकर्षण वाटतं. त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडतं. पक्षाच्या पाठबळामुळे मुलांची दादागिरीची वर्तणूक आणखी जोर धरते.

चार पावलं पुढे गेलं की कामाच्या आणखी पुढच्या दिशा स्पष्ट होतात. थोडा अधिक पुढचा रस्ता दिसतो.
पण मंजिल दूरच... रहाते !