News not found!
१९८७ सालच्या जानेवारीत पालकनीती ह्या मासिकपत्राची सुरवात झाली.
आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीघात सजगपणे पालकत्व निभावणं सोपं नाही. घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्नग नाही, उघड्या डोळ्यांनी बघणार्या. सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव होतच असते. ह्यासाठी ह्या काळात पालकत्व निभावणार्याी सर्वांशी जोडून घ्यावं, त्यामुळे प्रश्नां ची समज विस्तारेल, उत्तरांच्या दिशा नजरेत येतील ह्या कल्पनेनं ह्या संवादमाध्यमाची सुरवात झाली.
पहिल्या काही वर्षात वरपासून खालपर्यन्त गच्च भरलेला चार- आठपानी अंक निघत असे. पहिल्या काही वर्षांच्या एकाकी प्रयत्नांना पुढे समविचारी साथ मिळाली आणि त्यामुळेच आजवर तेवीस वर्षं हे मासिक एकही अंक न गाळता सुरू आहे. मासिक सुरू झालं तेंव्हा नव्हता, तरी पुढे १९९६ साली पालकनीती परिवार ह्या सार्वजनिक न्यासाची स्थापना झाली. एरवीचा अंक आता २०-२४ पानी असा छोटेखानीच असतो, पण एखाद्या विषयाला न्याय द्यायला दिवाळी अंक मात्र मोठा १५०-२०० पानी निघतो. एरवीच्या अंकात जाहिराती घेतल्या जात नाहीत. दिवाळी अंकात मात्र त्याला अपवाद करावा लागतो. शिक्षणाचे भाषामाध्यम, स्पर्धा, एकात्मिक जीवन, असुरक्षिततेचा शोध, शिक्षण, लैंगिकता शिक्षण, सामाजिक शास्त्रे, पालकांच्या मनात ठाण मांडून बसलेले प्रश्नठ, तरुणाईचे जीवन, परिवर्तन, अशा अनेक विषयावर आजपर्यन्त दिवाळी अंकांची रचना करण्यात आली आहे.
पालकनीती परिवारची स्थापना झाल्यावर १९९६ मध्येच लक्ष्मीनगर ह्या पुण्यातल्याच झोपडवस्तीतल्या मुलामुलींसाठी खेळघर सुरू झालं. वारजे भागातल्या लक्ष्मीनगर मध्ये पत्र्याच्या अगदी छोट्या छोट्या झोपड्यांमधून माणसं-मुलं राहतात. वीज पाणी संडास अशा मूलभूत सुविधाही त्यांना अभावानंच मिळतात. ह्या मुलांना शिक्षणाची आवड वाटावी असं काहीच नाही. घरात कुणाचा तसा आग्रह नाही. धाकटी भावंडं संभाळणं हीच पालकांची त्यांच्याकडून अपेक्षा असते. शाळेच्या दमदाटीच्या वातावरणात ही मुलं रमत नाहीत. त्यांना शिकण्याची गोडी लागावी, त्यातून त्यांच्यात असणार्या विविध क्षमतांचा विकास व्हावा ही खेळघराची कल्पना. आता खेळघरात १५० मुलं आहेत. सोईसाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि युवक अशा चार गटात काम चालतं. खेळघर, चर्चा मंडळ, अभ्यासवर्ग, जीवन-भाषा वर्ग, गणित वर्ग, पालक मंडळ, वैद्यकीय सहकार्य, वस्तीतल्या सामाजिक प्रश्नां ची दखल असे खेळघराच्या कामाचे रूप आता विस्तारले आहे. लक्ष्मीनगर वस्तीत आनंदसंकुल हे अनौपचारिक शिक्षणाचं केंद्रही चालवलं जातं आहे. इतरत्रही अशी खेळघरे उभी राहावीत यासाठी प्रशिक्षणाचे वर्गही गेल्या तीन वर्षांपासून घ्यायला सुरवात केली आहे.
पालकत्व, शिक्षण ह्या परिघातल्या विषयांवरची पुस्तकं, लेख, संस्थांची माहिती एकत्र उपलब्ध व्हावी म्हणून माहिती-घर असाही एक उपक्रम आहे. त्याचा व्हावा तेवढा उपयोग होत नाही, आम्हाला करून देता आला नाही याची खंत वाटते.
१९९८ साली मुलामुलींमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढावी यासाठी शिक्षक पालकांसाठी आणि ७वी - ८वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संदर्भ ह्या द्वैमासिकाची सुरवात पालकनीती परिवारानी केली. सोईसाठी पुढे संदर्भ ह्या नव्या न्यासाची स्थापना होऊन हे त्यामार्फत हे नियतकालिक पालकनीतीप्रमाणेच अथकपणे सुरू आहे. त्याशिवाय विज्ञानप्रेम वाढावे यासाठी काही प्रकल्पही संदर्भ संस्था आयोजित करत असते.
ह्याशिवाय पालकत्व आणि शिक्षणात काम करणार्याि इतर व्यक्ती आणि संघटनांची विनम्र जाणीव व्यक्त करण्यासाठी १९९७ ते २००३ या काळात पालकनीती परिवारतर्फे वार्षिक सामाजिक पालकत्व कृतज्ञता आणि प्रोत्साहन पुरस्कार दिले गेले.
पालकनीतीच्या अंकाच्या आकार आणि गुणवत्तेसोबत संपादक गटाचाही आकार आणि आवाका आता वाढलेला आहे. पण वेगळी आणि त्यामुळे आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे आता २३ वर्षांनीही संपादक गटातले कुणी मानधनही घेत नाहीत.
मुख्यत: ० ते १८ या वयोगटाच्या संदर्भातून पालकत्वाचा विचार पालकनीतीत प्राधान्यानं मांडला जात असला तरी पालकत्वाच्या आधाराची आवश्यकता असलेल्या सर्वांचाच विचार तीत केला जातो कारण तुकड्या तुकड्यानी त्याकडे न बघता घर-समाज आणि त्यावर परिणाम करणारे सगळेच घटक आपल्या पालकत्वात समाविष्ट असतात हे सत्य विसरता येणार नाही.
कोणीही व्यक्ती स्वत:पुरतं जगू शकत नाही. तसं जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे विविध अंगांनी फुलण्याची क्षमता असलेल्या जीवनाला धुमारे छाटून खुजं बनवणं आहे यावर मन:पूर्वक श्रद्धा आहे म्हणूनच पालकनीतीचा प्रवास आजही प्रसन्न संवेदनशीलतेने सुरू आहे.