News not found!
खेळघरात एकूण १५० मुलं आहेत. सोयीसाठी त्यांचे सहा गट पाडले आहेत, प्राथमिक गट, माध्यमिक गट, हायस्कूल गट, दोस्ती गट आणि युवक गट. सर्वसाधारणपणे प्रत्येक गटाला रोज २-३ तास वेळ मिळेल असं आवर्जून बघितलं जातं. लक्ष्मीनगर या झोपडवस्तीमध्ये तीन जागांमध्ये खेळघराचे वर्ग होतात. एका वर्गात साधारणतः २० - २५ मुले - मुली असतात. खेळघराच्या ऑफिसची जागा आनंदनिकेतन सोसायटीमध्ये आहे.
खेळघर या संकल्पनेचा महत्त्वाचा गाभा म्हणजे खेळघर व गटचर्चा हे दोन उपक्रम
खेळघर
खेळघर हा आमचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम! या उपक्रमापासूनच खेळघराची सुरुवात झाली आणि म्हणूनच संपूर्ण प्रकल्पाचे नाव ‘खेळघर’ पडले. सुमारे ३ ते ४ तासांसाठी त्या वयोगटातील सर्व मुलं एकत्र येतात. मुलं उत्सुकतेने पाहतील, वाचतील वा प्रश्न विचारतील, स्वतःच्या भाषेतून, कलेतून व्यक्त होतील असं वातावरण यामध्ये जाणीवपूर्वक जोपासलं जातं. हातांनी कलात्मक वस्तू बनवणं, चित्र काढणं, पौष्टिक खाऊ बनवणं, सिनेमे, प्रदर्शन, संस्था पाहणं व त्यावर चर्चा करणं, विविध क्षेत्रातल्या तज्ञांना भेटणं, संवाद साधणं यासारख्या अनेक अनौपचारिक गोष्टींचा यात समावेश असतो. यामुळे मुलांची चौकस बुद्धी, एकाग्रता, गटात एकत्र काम करण्याची सवय, निर्भयता यासारख्या गुणांचा निश्चितपणे विकास होतो.
इथं मुलं त्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर, सद्यस्थितीवर अथवा निरनिराळ्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात. अर्थातच यातून ताई व मुलांमधील जवळीक वाढीस लागते व मुलं मोकळेपणाने त्यांचे प्रश्न मांडू शकतात. जाणिवांच्या विकासासाठी हा उपक्रम अत्यंत गरजेचा आहे असा आमचा अनुभव आहे.
अभ्यास वर्ग
औपचारिक शिक्षणात किमान यश मिळवून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे खेळघराचं एक ध्येय आहे. अभ्यासवर्गात आमचा भर हा शालेय पाठ्यक्रमापेक्षाही मूलभूत संकल्पना समजण्यावर जास्त असतो.
जीवनभाषा वर्ग
जगताना विचार करणं, निर्णय घेणं, नवं शिकणं, बदल घडवणं अशा अनेक महत्त्वपूर्ण क्षमतांच्या विकासासाठी ‘भाषा’ हे प्रमुख साधन आहे. म्हणून भाषेच्या अभ्यासाला खेळघरात प्रथमपासून महत्त्व दिलं जातं. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. तसेच इतर विषय शिकण्यासाठीही ते तितकंच महत्त्वाचं आहे. इथली बरीच मुले ही परराज्यातून येतात. मराठी येत नसल्यामुळे बहुसंख्य मुलांचा शिक्षणातील रस संपतो म्हणून मराठी भाषा शिक्षणावर आमचा भर असतो.
इंग्रजीचे वर्ग
आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सद्यपरिस्थितीत थोडंफार तरी इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मुलांना प्राथमिक स्वरूपाचं इंग्रजी शिक्षण खेळघरात दिलं जातं.
गणिताचे वर्ग
रोज जगताना अनेकदा आपला गणिताशी सामना होतो. मूळ संकल्पना अतिशय कच्च्या राहिल्यामुळे मुलांच्या मनात गणित या विषयाबद्दल एक भीती असते. ती भीती घालवणं हे खेळघराचं एक उद्दिष्ट आहे. अंकगणित, मापन, हिशोब समजले तरच व्यवहारातील फसवणूक टाळली जाईल. आयुष्यातील प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा तार्किक विचारही गणितातून विकसित होतो.
विज्ञानाने मुलांचा तर्कशुद्ध विचार व प्रत्येक गोष्टीचा सर्वांगीण विचार विकसित होतो. शाळेतील विज्ञानात फक्त काही गोष्टी मुलांकडून पाठ करवून घेतल्या जातात, त्यातील अवघड भाषेमुळे वैज्ञानिक संकल्पना मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. खेळघराचा भर हा प्रामुख्याने करून पाहणं व अनुभव घेणं या गोष्टींवर आहे. सोपे, दैनंदिन आयुष्याशी जोडलेले प्रयोग प्रत्यक्ष करून पाहणं, वैज्ञानिक खेळणी बनवणं, त्या अनुभवांवर बोलणं असं विज्ञान वर्गाचं स्वरूप असतं.
विशेष कार्यक्रम
या औपचारिक वर्गांच्या जोडीला अनेक सहली, अभ्यासभेटी, प्रदर्शन, सिनेमे आयोजित केले जातात. वार्षिक स्नेहसंमेलन, दुकानजत्रा यासारखे मोठे कार्यक्रम तर नागपंचमी, दिवाळी यासारख्या पारंपरिक सणांचं नव्या पद्धतीनं साजरीकरण होतं. महिला दिन, वसुंधरा दिन यासारखे नवीन सणही उत्साहानं साजरे होतात. ह्या उपक्रमांच्या आखणीपासून कार्यवाहीनंतरच्या चर्चेपर्यंत मुलं अतिशय उत्साहानं सहभागी होतात, खूप काही शिकतात.
आरोग्य
वस्तीतील अस्वच्छता, टंचाई, वंचितता यासारख्या गोष्टींमुळे ब-याच मुलांचे आरोग्याचे प्रश्न जाणवतात. म्हणून मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आठवड्यातून दोनदा मुलांना पौष्टिक खाऊ दिला जातो, मुलांनी काय खावं आणि काय खाऊ नये यासाठी आम्ही मुलांशी व पालकांशी सतत संवाद करतो. मुलांची डोळे, कान तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी गरज वाटेल त्याप्रमाणे केली जाते. मानसिक आरोग्याचेही प्रश्न बऱ्याच प्रमाणात भेडसावतात. त्यासाठी खेळघराचे कार्यकर्ते मदतीला असतात
मुलांच्या विकासात पालकांचा सहभाग व त्यांचं प्रबोधन अतिशय महत्त्वाचं आहे. यामुळेच त्यांच्याशी सतत संवाद राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. यासाठी पालकभेटी व दर आठवड्याला एका गटाची पालकसभा या संवादासाठी आयोजित केली जाते.