News not found!

लक्ष्मीनगर बदलतंय .....

आता घराजवळ नळ झालेत, ड्रेनेजची सोय झालीये, स्वच्छता गृहे बांधलीयेत, रस्ते झालेत, बहुसंख्य कुटुंबांना रेशनकार्डे, विजेचे मीटर मिळाले आहेत. १५-२० वर्षे वस्तीत रहाणार्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. खेळघराच्या १५ वर्षांच्या, टिकून राहिलेल्या कामामुळे पालकांमधे शिक्षणाविषयीची आस्था वाढलेली जाणवते. खेळघराच्या प्रयत्नातून जवळपास २५ मुलं नि २० मुली स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या राहिल्यात - राहण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिकणं, चांगली नोकरी मिळवणं, शक्य आहे असा विश्वास त्यांच्या मनात रुजतो आहे.

तरीही नव्यानं स्थलांतरीत झालेल्या, होत असलेल्या कुटुंबांचं प्रमाण कमी नाही. अजूनही शाळांच्या वेळात रस्त्यांवर दंगा घालणारी अनेक मुले दिसतात. नाक्या-नाक्यावर टगे मंडळी उभी असतात. जुगाराचे डाव मांडून तरुण बसलेले असतात. दारू अजिबात कमी झालेली नाही. सकाळी ७ वाजता गाड्या भरभरून बांधकाम कामांवर जाणार्‍या कामगारांमध्ये अजूनही १०-१२ वर्षांची मुले-मुलीं मोठ्या संख्येने असतात. लक्ष्मीनगरला आता स्वतंत्र पोलिस चौकी मिळालीय. मारामार्‍या - खुनांच्या घटना थोड्याबहुत कमी झाल्यात. पण तरीही राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधी घोषणाबाजी करतात, लहान लहान मुलांनाही या गटांचं आकर्षण वाटतं. त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडतं. पक्षाच्या पाठबळामुळे मुलांची दादागिरीची वर्तणूक आणखी जोर धरते.

चार पावलं पुढे गेलं की कामाच्या आणखी पुढच्या दिशा स्पष्ट होतात. थोडा अधिक पुढचा रस्ता दिसतो.
पण मंजिल दूरच... रहाते !