News not found!

शिक्षणमाध्यम विशेषांक - दिवाळी २०१२

Magazine Cover

जगभरात सर्वत्र शिक्षणतज्ञांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून म्हणजेच पहिल्या चार-पाच वर्षात बाळाच्या आसपास नांदणार्‍या भाषेतूनच दिलं जावं हे मांडलेलं आहे. मूल ज्या सामाजिक वातावरणात वाढतं त्याचा परिणाम त्याच्या वाढ-विकासावर होत असतो. विशेषत: मुलाच्या शिक्षणाची बीजं ही मुलाच्या परिसरातल्या भाषेतच रुजू लागतात. त्याचं भोवतालच्या जगाचं आकलनही भाषेसोबतीनंच आकार घेत असतं. मूल शिकतं, विचार करू लागतं, आपल्या स्वत:च्या मनात आपला आपला विचार करू लागतं. किती अदभूत गोष्ट! भाषेशिवाय विचार होऊ शकतो की नाही हे अद्याप नेमकं सांगता आलेलं नाही. तरीही विचार करणं ह्या माणसाच्या विलक्षण क्षमतेशी भाषेचा फार जवळचा संबंध आहे, एवढं तर आपल्याला सर्वांनाच कुणी न सांगताही कळतं. आसपासच्या दिसू शकणार्‍या जगाचं भान जरी मुलाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं येत असलं तरी ते काही पूर्ण नव्हे, आणि ही त्याची समजेची व्याप्ती विस्तारायची असेल तर त्याला शिक्षणाची गरज आहे. हे शिक्षण त्याच्या मनाच्या जगात पोचायला हवं असेल, त्यावर त्याला आपला स्वत:चा असा विचार करता यायला हवा असेल, त्या विचारातून स्वत:चाच नाही तर त्या विषयाचा आवाकाही वाढायला हवा असेल, तर ते शिक्षण त्याला आकळलेल्या भाषेतच असायला हवं. कारण, भाषा ही केवळ एक संज्ञापनाची संरचना नाही तर आपल्या अस्तित्वाशी, सांस्कृतिकतेशी भाषा जोडलेली असते. भाषा ही व्यक्तीला समष्टीशी जोडणारी नाळ असते.
Open page_1.jpg

मातृभाषेला काहींनी स्व-भाषा किंवा जैविक भाषा असंही म्हटलं आहे, कारण ती केवळ आईची, आसपासची भाषा राहत नाही, तर आपली स्वत:चीही होऊन जाते. मातृभाषेचं शिक्षण आसपासच्या भाषावाहक वातावरणातून कुणी न शिकवताही मूल आपापलंच कसं घेऊ शकतं, त्यातील सूक्ष्म संदर्भ मुद्दाम कुणी न दाखवताही बरेचदा त्याला आपापले कसे कळतात हेही अद्याप संपूर्णपणे उमजलेलं नाही. भाषिक प्रज्ञा कमीजास्त असणारी मुलं, इतकंच काय बौद्धिकदृष्ट्या मागे पडणारी मुलंही मातृभाषा शिकतातच. या दृष्टीनं पालकनीतीच्या अगदी पहिल्या वर्षात - १९८७ एप्रिलच्या अंकात आणि १९९३च्या दिवाळी अंकातही शिक्षणमाध्यम या विषयावर विस्तारानं मांडणी झालेली होती. आजच्या काळात ती मांडणी तशीच्या तशीच लागू पडते की त्यात काही बदल त्यात आवश्यक आहेत, याचा एक अंदाज आपण मोकळेपणानं घ्यायला हवा आहे.

गेल्या वीस वर्षातली जगातली-देशातली परिस्थिती झपाट्यानं बदलते आहे. आपल्या सर्वांचीच भाषा आता बरीचशी इंग्रजीत आणि थोडीशी हिंदीत बुचकळून काढल्याप्रमाणे झालेली आहे. दूरचित्रवाणी आपल्या विविध चॅनल्समधून तर्हे तर्हे ची भाषा आपल्यावर ओतते आहे. शहरांमध्ये विशेषत: मुंबई-पुण्यामध्ये तर कामाच्या जागी वापरली जाणारी भाषा जवळजवळ इंग्रजीच झालेली आहे. त्याचा परिणाम तिथल्या लोकांच्या एरवीच्या बोलण्यावागण्यामध्येही साहजिकच झालेला आहे. एका पाहणीनुसार, तुम्हाला इंग्रजी येतं का असं विचारलं तर सुमारे 40% लोक होकारार्थी उत्तर देताना आढळले. याचा अर्थ एवढ्या लोकांना इंग्रजी येतं असा मुळीच नाही, पण आपल्याला यायलाच हवं त्याशिवाय आपला या जगात निभाव लागणार नाही असं मात्र या लोकांना वाटतं आहे, आणि त्याचाच परिणाम त्यांच्या उत्तरातून व्यक्त होताना दिसतो. खेड्यांमधून शहरांकडे नोकर्यां साठी धावत सुटलेला लोंढा मग या नव्या मिंग्लिशला आसासून स्वीकारू पाहतो.

भ्रमण-भाष (सगळ्यांना कळावं म्हणून मोबाईलच म्हटलेलं बरं) आता कुठेही जा शहरात खेड्यात, महिला मंडळात अगदी शाळांमध्ये सुद्धा सान-थोरांच्या हातात लकाकताना दिसतो. त्याच्या जोडीला आलेलं महाजाल पण शहरांमध्ये तर अनेकांकडे आहेच; आणि घरी नसलं तरी गल्लोगल्ली त्याची ‘अमृततुल्य’ दुकानं थाटलेली आढळतात. या नव्या माध्यमांच्या सोईसाठीही भाषेची ओढाताण करावी लागते.

अर्थात, मोबाईलनी केलेली संपर्काची सोय आणि महाजालानं केलेली संपर्काची महासोय यामुळे माहितीची खुली देवाण-घेवाण वाढली आणि त्यामुळे एकंदरीनं संकुचित वृत्तीलाही छेद जातो आहे, हेही मान्य करायला हवं.

मुलांच्या औपचारिक शिक्षणासाठी भाषा –माध्यम कोणतं असावं या प्रश्नाचं उत्तर जरी या बदललेल्या परिस्थितीनं बदललं नसलं तरी त्याचा विचार आता वेगळ्यानं करायला लागतो आणि लागणार; हे तरी आपल्याला स्वीकारावं लागतं. आजवरच्या काळात इंग्रजीशिक्षणाची संधी उपलब्ध नसलेल्यांनाही ‘मुलाबाळांना तरी इंग्रजी आलंच पाहिजे’ असं आता आवर्जून वाटतं, तेही साहजिकच आणि एका अर्थी योग्यच नव्हे का?

पण मग, अशा परिस्थितीत नेमकं काय करायला हवं? यावर एक उपाय म्हणून ‘पहिलीपासून इंग्रजी हवं’ अशा अट्टहासानं उभारलेल्या व्यवस्थेतून आपलं हे इप्सित साध्य होतं आहे का, हेही पहायला हवं.

मूलभूत शिक्षणनीतीतत्व तर बदलत नाही, पण मुलांच्या कानांवर पडणारी भाषाच वेगळी बनून गेल्यामुळे, काहीशी मर्यादित, ढोबळ आणि साचेबंद पद्धतीनं व्यक्त होणारी, एकसुरी व उथळ वाटते आहे. त्याचा परिणाम म्हणून मुलांची भाषाक्षमता आणि त्याच्या सहयोगानं वाढणारी विचारक्षमताही खुजट होत जाताना दिसते आहे.

हा मुद्दा आता दुर्लक्ष करण्याजोगा उरलेला नाही ह्याबद्दल बहुधा दुमत नाही. म्हणूनच पालकनीतीचा २०१२चा दिवाळी विशेषांक शिक्षण-भाषामाध्यम या विषयावर पुन्हा एकदा काढायला हवा, असं आम्हाला वाटलं.

या अंकात अनेक शिक्षणतज्ज्ञ, भाषा-अभ्यासक आणि मान्यवर लेखक-लेखिकांचे लेख आहेत.

Comments

how to overcome ed by Anonymous
how to overcome ed by Anonymous
Hier ist der einfach by Anonymous

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...