News not found!
बहात्तर वेळा नाचवलास पाय
छुमछुम कसं वाजतं ते बघायला.
त्या घुंगरांच्या नादाला
बेचाळीसच्या वर्गानं गुणलं की येतं
ते तुझं खिदळणं - आभाळभर झालेलं.
कधी घरात आहेस की नाहीस इतकी
एकाग्र निःशब्द रममाण असतेस भातुकलीत
किंवा तोंडानं ‘ब्रुम-ब्रुम’ म्हणत
हात पसरून धावतेस
दहा बाय दहाच्या विशाल अवकाशात.
कठड्यावरून जिन्याच्या
सुळ्कन येतेस घसरत
माझा श्वास मला आवरत नाही.
म्हणूनच गच्चम्गर्दीच्या रस्त्यावर
तुझ्या क्रिकेटमध्ये मी
आधीच झेलबाद व्हायला तयार आहे.
कधी चौकात समोर येतेस
खेळणी विकतेस, कसरती करतेस
परवा म्हणालीस घ्या ना गजरे
मला खेळायला जायचंय.
त्या अक्राळ विक्राळ जगापासून
तुझा खेळ छातीशी संभाळून धरण्याऐवजी
पाकिटाकडे गेलेला माझा हात
आपण कलम करून टाकूया?
साबणाचे बुडबुडे काढतेस
वास्तवाची प्रतिबिंबं त्यावर
सोनेरी वर्खानं मांडतेस.
जगाचे नियम झुगारत ते वर..वर..वर.. जातात
माझं मनही कलम करायला हवं,
त्या वरचढ कल्पनाचित्रांची किंमत
फुटकळ ठरवल्याबद्दल...
वास्तवाच्या काठावरून
तू छलांग मारतेस,
आमच्या खुरट्या मनांची
मग, आम्हालाच लाज वाटते.
दगडांवरून धावणार्या
तुझ्या चकारीची टणटण..
मला निकरानं बजावते,
‘आता तरी ठरवायलाच हवं
तुझ्या हक्काचं सारं सारं
तुझ्या वाट्यात यायलाच हवं
- हो, अगदी खेळसुद्धा.’
Comments