News not found!

नवा प्रकल्प - शालाबाह्य वर्ग

सहा वर्षांच्या पुढच्या, शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी खेळघरानं काम करावं असं फार दिवस मनात होतं. शाळेत न जाणार्‍या मुलांमधे कर्नाटकातल्या स्थलातरितांची संख्या जास्त आहे. भाषिक प्रश्न, गरिबी, धाकट्या भावंडांना संभाळायला मोठ्या बहिणींना घरी थांबावे लागते, अंधश्रद्धा अशा अनेक कारणांनी ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. शाला बाह्य वर्गात गाणी, गोष्टी, खेळ, कला या गोष्टींत ही मुलं रमू लागतात. त्यांच्या मनात शाळेत जाण्याची इच्छा मूळ धरते. मग जूनमधे ताई त्यांचे जन्माचे दाखले मिळवून देतात आणि पालकांचे समुपदेशन करून शाळेत प्रवेश घेतला जातो.

ही मुले शाळेत जातात ना याकडे ताईचे लक्ष असते. शाळेत जाऊन दुपारच्या वेळात ही मुलं खेळघराच्या प्राथमिकच्या वर्गातही येऊ लागतात. गेल्या तीन वर्षांत ह्या गटाची व्यवस्थित घडी बसली आहे. मात्र आम्ही प्रयत्न केले म्हणून सर्व मुलांना विशेषतः मुलींना शाळेत जाणे शक्य होते असे नाही. परिस्थिती जिथे अगदी बिकट असते, आईला घर नि मूल मोठ्या मुलीवर टाकून जाणे भागच असते, तिथे त्या मुलींच्या शिक्षणावर गदा येते.

या मुलींवर ‘मुलगी’ म्हणून खूप बंधनं असतात. १४-१५व्या वर्षी त्यांची लग्ने होतात. या मुलींना किमान जीवन कौशल्यांचे शिक्षण मिळावे, आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आम्ही गेल्या वर्षी ‘येल्लरू’ (आपण सार्‍याजणी) हा नवीन प्रकल्प सुरू केला. या वर्षी ‘प्राज फाऊंडेशन’ या कंपनीने या प्रकल्पाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले आहे.