News not found!

नवा प्रकल्प - नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून

बर्‍याच जणांना आपण समाजासाठी काहीतरी करायला हवं असं वाटतं. पण समविचारी साथीची कमतरता जाणवत असते. अशा मित्रांना खेळघरासारखं काम सुरू करण्यासाठी बळ मिळावं, दिशा मिळावी यासाठी खेळघरानं ३ वर्षांपूर्वी ‘प्रशिक्षण शिबिरं’ घ्यायचं ठरवलं.

साधारणतः दिवाळीनंतरच्या काळात ५ दिवसांचे शिबिर असते. आजवर ३ वर्षांत सुमारे १६० लोक या शिबिरात सहभागी झाले. शिबिराची सुरवात खेळघर आणि आनंदसंकुल अनुभवण्यातून होते. भाषा, कला, नकाशाची भाषा, खेळ अशा विविध विभागांमधून ऍक्टीव्हिटी करून बघताना लोकांना खेळघराच्या अनौपचारिक वातावरणाचा आणि पद्धतींचा अनुभव घेता येतो.

‘शिकण्या’ संदर्भातल्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून दुसर्‍या दिवशीची सुरवात होते. बालमानसशास्त्र, जाणिवांचा विकास, लैंगिकता शिक्षण, संवादाचे माध्यम या विषयांबरोबरच भाषा, गणित, विज्ञान, अशा अनौपचारिक विषयांसंदर्भातल्या पद्धतींवर पुढील पाच दिवसात काम होतं. खेळघरातील आणि पालकनीती परिवारातली मंडळी विविध सत्रे घेतात.

या शिबिरांच्या माध्यमातून आता चार नवी खेळघरे सुरू झाली आहेत. BSSK - सांगली, प्रगत शिक्षण संस्था - फलटण, निरामय विकास संस्था - सावंतवाडी या कामांबरोबरच खेळघराच्या युवकगटानेही २ खेळघरे सुरू केली आहेत.

पुढील २-३ वर्षे आम्ही या नव्या खेळघरांच्या संपर्कात रहातो. त्यांना मदत करतो. याव्यतिरिक्त अनेक संस्थांच्या सध्याच्या अनौपचारिक शिक्षणाच्या कामातही या शिबिराची मदत होते. ह्या प्रकल्पाच्या निमित्तानं आम्ही करत असलेलं कामाचं अधिक बारकाईनं विश्लेषण केलं नि मांडलं. अनेक शैक्षणिक साधने आणि माहितीच्या लिखीत प्रतीही तयार झाल्या.