News not found!
इथपर्यंत वाटचाल झाली तरी प्रश्न संपले आहेत असे म्हणता येणार नाही.
• विविध उपक्रमांमुळे खेळघराचा खर्च प्रचंड वाढला आहे. आणि आता सर रतन टाटा ट्रस्टच्या फंडींगची ३ वर्षांची मुदत संपतेय. पुन्हा व्यवस्था करायला हवी. पुन्हा शोध घ्यायला हवा. अनेकदा वाटतं मुलांबरोबरचं काम मागे पडून इतरच व्यवस्थापनाच्या कामात खेळघरातल्या सक्षम कार्यकर्त्यांचा अधिक वेळ जातोय.
• खेळघरातल्या मुलांची संख्या वाढली आहे. नवे प्रकल्प सुरू झाले आहेत त्यामुळे आत्ताची जागा कमी पडते आहे. वस्तीतच आणखी एखादी जागा शोधत आहोत.
• खेळघरात मुलांना दादा मिळत नाही. सगळ्या ताया आणि काकूच. त्याबरोबरच नवीन माणसं जोडली जाताहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी जबाबदारी वाढलीय.
• खेळघराचे काम आता पूर्णपणे शैक्षणिक झाले आहे. वस्तीतल्या सामाजिक प्रश्नांमधे लक्ष घालणे आता शक्य होत नाहीये. कारण बहुतेक वेळा हे प्रश्न वस्तीपुरते मर्यादित असत नाहीत. त्यासाठी व्यापक पातळीवरच्या आंदोलनांशी जोडून घेणं गरजेचं असते. खेरीज हे काम प्रचंड वेळ आणि ताकद खाणारे असते. सामाजिक प्रश्नांमधली गुंतवणूक वाढली की त्यातून पुढे उभी राहणारी आव्हानं प्रसंगी रचनात्मक कामासाठी अडथळा ठरतात. विचारपूर्वक आम्ही शिक्षणाच्या रचनात्मक कामावरच भर द्यायचा असे ठरवले आहे.
मात्र त्यामुळे आपण मुलांच्या वास्तवापासून, भावविश्वापासून थोडे अंतर राखतो हे स्वीकारावे लागत आहे.
• ताया-कार्यकर्त्यांचा गट आता खूप मोठा झाला आहे. मिटींग्जमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायला वेळ व अवकाश मिळेनासा झालाय. नवे प्रकल्प, टारगेटस् या कामाच्या ताणामुळे व वेगामुळे लोकशाही पद्धतीनं निर्णय प्रक्रियेसाठी लागणारा वेळ देणं परवडेनासं झालंय.
• वाढत्या कामाच्या रेट्यामुळे अधिक रचना बद्धतेकडे आम्ही झुकू लागलो आहोत. त्यामुळे उत्स्फूर्ततेला, लवचिकतेला अनेकदा फाटा द्यावा लागतोय.
• मुलांची मानसिकता घडवण्यासाठी पालकांमधे बदल घडवणे आवश्यक आहे. पुढील काळात पालकांबरोबरचे काम अधिक नेटाने करण्याची गरज आहे.
• कुमारवयीन - मुले व मुलींमधलं काम हे खेळघराचं वैशिष्ट्य. पण या गटाबरोबर अतिशय ताकदीनं व तयारीनं काम करावं लागतं. त्या ताकदीचे कार्यकर्ते तयार होणं हे आव्हानच आहे. कुमारवयीन व युवक गटातील मुला-मुलींची मानसिकता समजावून घेऊन पुढे अधिक सक्षमतेनं काम करण्याकरता खेळघराच्या कार्यकर्त्यांना अधिक सखोल प्रशिक्षणाची गरज आहे.
• नवी खेळघरे, शालाबाह्य आणि येल्लरू प्रकल्प, युवक गट अशा नव्या प्रकल्पांमुळे कामाचा आवाका वाढतो आहे. त्याबरोबरच आव्हानंही वाढताहेत.