News not found!

आजची परिस्थिती

आज खेळघर लक्ष्मीनगर मधल्या १५० आणि नव्या खेळघरांच्या माध्यमातून आणखी १५० मुलांपर्यंत पोचू शकले आहे. खेळघरात सलग ३-४ वर्षे नियमित येणार्‍या मुलांमधे निश्चित बदल जाणवतात. त्यांचा व्रात्यपणा कमी होऊन ती शिकण्याकडे वळलेली दिसतात. त्यांच्यात आत्मविश्वास जाणवतो. तायांशी तर ते त्यांना आवडलेल्या - खटकलेल्या गोष्टी मोकळेपणाने बोलतातच पण अगदी परदेशी पाहुण्यांशीसुद्धा बोलायला बिचकत नाहीत.

नियमित येणारी ९५% मुलं दहावीपर्यंत पोचतात, पास होतात नि त्यांना पुढे शिकण्याची इच्छाही असते. एवढेच नव्हे तर खेळघराकडून आर्थिक मदत मिळवण्याकरता योजलेले निकष पूर्ण करून दाखवतात. युवक गटातल्या तीन मुलांचे गेल्या वर्षी डिप्लोमा इंजिनियरींग पूर्ण झाले. त्यातली दोघे आता डिग्री इंजिनियरींग करताहेत. दोघांना चांगल्या नोकर्या लागल्यात. मुलीही, डिप्लोमा इंजिनियरींग, आर्किटेक्चरल ड्राफ्टस्मन, नर्सिंग, डी.एड., बालवाडी शिक्षिका सारखे कोर्स करताहेत. खेळघरात येणार्या मुलींची लग्ने आता १८ वर्षानंतरच होतात.

टगेगिरी, व्यसने - गुन्हेगारी ह्या दिशेनं असलेली मुलग्यांची ओढ आता पुष्कळशी कमी झालीये. भिन्नलिंगी आकर्षणांसंदर्भात मुलगे नि मुली आता अधिक जबाबदारीनं वागतात. मुलग्यांपेक्षा मुली अधिक प्रयत्नशील व समजूतदार वागताना दिसतात. खेळघरातून मिळणार्या प्रत्येक संधीचा त्या फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. त्यांचे पालक आता लवकर लग्नाकरता मागे लागत नाहीत उलट दहावीनंतर ३-४ वर्षे शिकवण्याची त्यांची तयारी वाढते आहे.

खेळघरात आज ३ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ७ पगारी कार्यकर्ते पूर्णवेळ काम करतात. ८ जण अर्धवेळ काम करतात. या खेरीज ७ स्वयंसेवी कार्यकर्ते आठवड्यातून २ ते ३ दिवस काही वेळ करता काम करतात. खेळघराकडे असलेल्या दोन्ही जागांतही आता काम मावत नाहीये. वस्तीमधे जागेचा शोध चालू आहे.

खेळघर विविध पुस्तके, शैक्षणिक साधने, शैक्षणिक उपकरणे, खेळ यांनी समृद्ध आहे. गेल्या वर्षभरात खेळघराला २ पुरस्कार मिळाले. झी २४ तास चा ‘अनन्य पुरस्कार’ आणि ‘गरवारे बालभवनचा पुरस्कार’ या पुरस्कारांमुळे व वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखांमुळे खेळघराचं काम अनेकांपर्यंत पोचते आहे.

खेळघरातल्या मुला-मुलींमधे सामाजिक भान रुजतंय, सभोवतालच्या समाजासाठी त्यांनाही काही काम करावंसं वाटतंय. मोठ्या मुलांकडून धाकट्यांना प्रेरणा मिळतेय.

खेळघराचे काम आता एका व्यक्तीभोवती केंद्रित राहिले नाही. पालकनीती परिवाराचे ३ विश्वस्त, २ स्वयंसेवी कार्यकर्ते आणि ३ पगारी कार्यकर्ते अशांचे मिळून ‘कार्यकारी समिती’ बनली आहे. कामासंदर्भातले सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेते. कामांच्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या जातात.